पुणे: कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याने हवामान विभागाने येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील कोकणात दमट व उष्ण हवामान राहणार आहे, तर धुळे, नंदूरबार, लातूर, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात ४८ तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट दिला आहे. पुणे व परिसरात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
सध्या आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाळी वातावरण तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट, अशी परिस्थिती निर्माण झालेली पहायला मिळत आहे. सध्या विदर्भ चांगलाच तापत आहे, तिथले कमाल तापमान चाळीशी पार गेलेले आहे. दरम्यान, पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला. तसेच दुपारी देखील ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडका कमी जाणवला.