लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर असलेला चक्रीय चक्रवात आता विरुन गेल्याने हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून कोकणात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. दाभोलिम २, महाबळेश्वर ११, यवतमाळ १ मिमी पावसाची नोंद झाली होती.
कोकण, गोव्याच्या बर्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. रत्नागिरीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंशाने वाढले आहे. क़ोकण गोव्याच्या बर्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३७.१, लोहगाव ३७.३, जळगाव ३८.२, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर २९.१, मालेगाव ३६.८, नाशिक ३६.४, सांगली ३७.७, सातारा ३६.१, सोलापूर ३९.१, मुंबई ३६.४, सांताक्रुझ ३८.७, रत्नागिरी ३७.३, पणजी ३४.८, डहाणु ३७.८, औरंगाबाद ३६.८, परभणी ३७.८, अकोला ३९, अमरावती ३८, बुलढाणा ३६.५, ब्रम्हपुरी ३९.५, चंद्रपूर ४०.६, गोंदिया ३७, नागपूर ३७, वर्धा ३७.४.