लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचवेळी राज्यात मिनी लॉकडाऊन सुरु होत आहे. रात्री संचारबंदी जाहीर झाली असतानाच रात्रीच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या संचारबंदीच्या काळात लोकांना घरात बसणे मुश्कील होऊ लागले आहे. राज्यात रविवारी सर्वधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशात विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागात व कोकण, गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दिवसा रस्त्यावरुन फिरणे अशक्य होत आहे. संचारबंदीमुळे रात्री बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
पुढील काही दिवसात राज्यातील कमाल तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी रात्रीच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८.४, लोहगाव ३८.९, जळगाव ४१.१, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्वर ३१.९, मालेगाव ३८.८, नाशिक ३७.६, सांगली ३८.९, सातारा ३८.१, सोलापूर ४०.८, मुंबई ३२.७, सांताक्रुझ ३२.६, अलिबाग ३१.७, रत्नागिरी ३३, पणजी ३३.५, डहाणु ३३.४, औरंगाबाद ३९.२, परभणी ४१.१, नांदेड ४१, अकोला ४२.१, अमरावती ४१.४, बुलढाणा ३९, ब्रम्हपुरी ४१.३, चंद्रपूर ४२, गोंदिया ४०, नागपूर ४०.२, वर्धा ४०.६.