लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार असल्याचा सांगावा हवामान विभागाने नुकताच दिला असताना आज पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे शहर व परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २४ मिमी, तर लोहगाव येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेले काही दिवस दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली असतानाच रात्रीच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली होती. त्याचा परिणाम आज दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोरही कमी झाला. साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. काही वेळानंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसाचा जोर नगर रोड, हडपसर भागात पावसाचा जोर अधिक होता. काही वेळातच रस्त्यावर पावसाचे लोंढे वाहू लागले. अनेक ठिकाणी पाण्याचे तळे झाले होते. काही ठिकाणी ड्रेनेज सफाई करून त्यातील घाण तेथेच काढून ठेवली होती. या पावसात ती पुन्हा ड्रेनेज लाईनमध्ये गेल्याचे दिसून आले.
सध्या लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. त्यामुळे नेहमी पाऊस पडला की वाहतूककोंडीचे चित्र आज दिसले नाही.
कोकणातील चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग खूप असल्याने थोडा पाऊस झाला असतानाही वेगवान वाऱ्यामुळे शहरात ५५ झाडे कोसळली होती. मात्र, आज पावसाचा जोर असला, तरी वारा जोरात नसल्याने किरकोळ झाडपडीच्या घटना घडल्या.
दक्षिण पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत कमीदाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
पुणे शहर व परिसरात आकाश सायंकाळनंतर ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणार असाल व सायंकाळी परत येणार असाल तर बरोबर छत्री अथवा रेनकोटजवळ बाळगण्याची दक्षता घ्यावी.
....
रात्री साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिमी)
शिवाजीनगर २४
लोहगाव ३६
कात्रज २
खडकवासला ३.२
कोथरुड १८.६