लोणावळा (पुणे) :लोणावळा, खंडाळा परिसरात सोमवारी (दि. १७) परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. दुपारी चारनंतर सुमारे तासभर शहरात जोरदार पाऊस झाला. खंडाळा भागात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे द्रुतगती मार्गाच्या पुलावरून खाली राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचा लोंढा लागला होता.
लोणावळा शहरात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दिवाळी तोंडावर आली तरी पाऊस थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. फटाका दुकानदार व दिवाळी साहित्य विक्रेते, दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत जाणारे नागरिक या सर्वांना या लहरी पावसाचा फटका बसत आहे.
सोमवारी पहाटे लोणावळा परिसरात हलक्या पावसाचा शिडकाव झाला. त्यानंतर दुपारपर्यंत कडक ऊन पडले होते. दुपारी दोननंतर अचानक आकाशात काळ्या ढगांची गर्दी होऊ लागली. हलका पाऊस पडल्यानंतर सायंकाळी चार वाजता पुन्हा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. कुठे कमी, तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस झाला. खंडाळा व लोणावळा शहराच्या बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले.
लोणावळा शहरात सोमवारी २४ तासात ४५ मिमी (१.७७ इंच) पावसाची नोंद झाली आहे. शहरात आजपर्यंत ५४८८ मिमी (२१६.०६ इंच) पाऊस झाला आहे, तर गेल्या वर्षी ४७६८ मिमी (१८७.७२ इंच) पाऊस झाला होता.