पुणे : शहर व जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर धरणे पूर्ण भरल्याने नद्यांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारपासून सुमारे ३० हजार ६७७ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. जिल्ह्यातील धरणसाठा आता २०० टीएमसी अर्थात १०१ टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील २६ धरणांपैकी वीस धरणे काठोकाठ भरली आहेत. अन्य पाच धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सध्या केवळ माणिकडोह हे एकच धरण ८२ टक्के भरले आहे. तर पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून सायंकाळी ३०६७७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत होता. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतचा इशारा देण्यात आला होता.
जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतका असून, शुक्रवारी सकाळवाजेपर्यंत या सर्व धरणांमध्ये सुमारे २००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा १०१ टक्के इतका झाला आहे. गेल्यावर्षी हाच साठा १७६.२८ टीएमसी अर्थात ८८.८७ टक्के इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा २४.३१ टीएमसीने जास्त आहे, तर एकूण साठ्यात १२.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील भरलेली धरणे
खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, कासारसाई, कलमोडी, चासकमान, आंद्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, वीर, नीरा देवघर, वडज, डिंभे, विसापूर व उजनी (१०८.६६ टक्के).
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला
खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये शुक्रवारी (ता. १६) सकाळपासूनच विसर्ग सुरू होता. सकाळी हा विसर्ग ६८४८ इतका होता. दुपारी बारा वाजता तो २२,८८० क्युसेकने करण्यात आला. एक वाजेनंतर तो ३० हजार ६७७ क्युसेक करण्यात आला, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय पाटील यांनी दिली. याशिवाय मुळशी धरणातून २६ हजार ४०० क्युसेकने, चासकमानमधून १२ हजार ६५० क्युसेकने, पवना धरणाच्या सांडव्याद्वारे १० क्युसेकने आणि कासारसाई धरणातून एक हजार ३५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.