पुणे : पुणे शहरात दिवसा कडाक्याचे उन जाणवत असून, आज (दि.१५) सायंकाळी पुणे शहरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याअगोदर दुपारी साडे तीनच्या सुमारास गारायुक्त पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात व राज्यातही तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे. त्यानंतर ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
केरळ ते छत्तीसगड दरम्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सध्या आकाशात मोठे ढग तयार होण्यास सुरवात झाली असून, काही मोठे ढग पुणे शहर व जिल्ह्यावर येत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने पुण्यात व जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी व वाऱ्यासह, विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच शहराच्या आजुबाजूला चारनंतर पावसाला सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.नागरिकांनी ढगांच्या गडगडाटावेळी झाडाखाली आसरा घेऊ नये, पाऊस पडल्याने रस्ते निसरडे होतात आणि वाहने घसरतात. त्यामुळे वाहने हळू चालवावीत. वीज कडकडाट असताना मोबाईलचा वापर करू नये, जोरदार वारा असेल तर दारा, खिडक्या बंद कराव्यात, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.