पुणे : दुपारच्या प्रचंड उकाड्यानंतर साडेतीन चार वाजता पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेे. पुण्यासह राज्यात येत्या आठवडाभर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यामध्ये या आठवड्यामध्ये दुपारी तापमानात वाढ होणार असून, सायंकाळी मात्र पावसाची हजेरी लागणार आहे. मध्य महाराष्ट्, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीठ आणि सोसायट्याचा वारा सुटेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.वातावरणात दमट वातावरण असून, हवेत आर्द्रता देखील आहे. त्यामुळे दिवसा उकाडा अधिक जाणवणार आहे. तसेच रात्री देखील उष्ण झाल्या आहेत. शुक्रवारी (दि.१०) राज्यामध्ये बऱ्याच भागात पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे पुण्यात जोरदार वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. हवेचा वेग एवढा होता की, अनेक ठिकाणी झाडे पडली.
या आठवड्यामध्ये पुणे, नाशिक, सातारा, नगर, छ. संभाजीनगर, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि विदर्भातील नागपूर, नंदूरबार, वर्धा, अमरावती, वाशिम, गोंदिया या ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच दुपारी घराबाहेर पडू नये, उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.