Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 12:06 PM2024-08-04T12:06:45+5:302024-08-04T12:07:16+5:30

पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले

Heavy rain in Pune Due to the filling of the dams there is a large amount of discharge, the army, NDRF are deployed in the flood prone areas | Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात

Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात

पुणे : पुणे शहरात काल रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मागील महिन्यात एका दिवसाच्या पावसाच्या पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. धरणातून मोठ्या प्रमाणात झालेल्या विसर्गामुळे पुण्यातील नदीकाठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.  या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. 

पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यात प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. कालही महापालिका, जलसंपदा विभाग, अग्निशमन दल यांना सूचना दिल्या होत्या. पाणी सोडण्याअगोदर लोकांना सूचित करा, सायरन वाजवा असे सांगण्यात आले आहे. लष्कराशी आमचे बोलणे झाले आहे. जिकडे पूरपरिस्थिती आहे तिकडे एनडीआरएफ आणि लष्कर तैनात करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून २६.९९ टीएमसी पाणी वाढले असून ९२.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर आज सकाळी ११ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २९ हजार ४१४ क्युसेकने होणारा विसर्ग वाढवून 35 हजार 2 क्यूसेक करण्यात आला आहे. मुळशी धरणातून मुळा नदीत सुरु असणारा २४ हजार ७४५ क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता २७ हजार २८२ करण्यात येणार आहे. धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रोड परिसरात एकता नगरी, सरिता नगरी, डेक्कन नदीपाञ, एरंडवणा, खिलारेवाडी, दत्तवाडी, विश्रांतवाडी येथे व इतरञ ठिकाणी दलाचे अधिकारी व जवान टॉर्च, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, मेगा फोन्स व बोट अशा बचाव साहित्यासह तैनात असून मेगा फोनवरुन सूचना देण्यात येत आहेत.

नागरिकांनी वाहने हळू चालवावीत 
 

शहरातील रस्त्यांवर सुट्टीचा दिवस असल्याने वाहनांचे प्रमाण कमी दिसून आले आहे. परंतु लोकांना आज कुठेही बाहेर फिरायला जाणे शक्य झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी, केळकर, फर्ग्युसन, बाजीराव, जंगली महाराज रस्ता याबरोबरच स्वारगेट, हडपसर, धनकवडी, धायरी उपनगरात मुसळधार पाऊस होतोय. पावसाळयात बऱ्याच रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे. महापालिकेकडून रस्त्यांची तात्पुरती डाकडूची केली जात आहे. पण दोन - तीन दिवसात त्याच जागेवर खड्डा तयार झाल्याचे दिसत आहे. रस्त्यांवर खडे, वाळू पसरलेली दिसून आली आहे. त्यामुळे वाहने चालवताना घसरण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी हळूहळू वाहने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. 

अजित पवारांनी दिले निर्देश 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी.  त्यांना संपूर्ण मदत, सहकार्य करावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पुररेषेलगतच्या नागरिकांनीही आवश्यक काळजी घ्यावी, प्रशासनानेही त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Web Title: Heavy rain in Pune Due to the filling of the dams there is a large amount of discharge, the army, NDRF are deployed in the flood prone areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.