पुणे : पुणे शहरात सकाळापासून संततधार पावसाला (Pune Rain)सुरुवात झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. किरकोळ पावसाने सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून गाडी चालवणे कठीण असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना एक - दोन तास ट्राफिक मध्ये अडकून राहावे लागत आहे. या वाहतूक कोंडीला पुणेकर अक्षरशः वैतागल्याचे चित्र दिसून आले आहे. पाऊस काय तर इतर वेळीसुद्धा ट्राफिक (Pune Traffic) दिवसेंदिवस वाढत चालल्याचा प्रतिक्रिया पुणेकरांकडून येऊ लागल्या आहेत.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी, केळकर, फर्ग्युसन, बाजीराव, जंगली महाराज रस्ता याबरोबरच स्वारगेट, हडपसर, धनकवडी, धायरी उपनगरातही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पावसाळयात बऱ्याच रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे. महापालिकेकडून रस्त्यांची तात्पुरती डाकडूची केली जात आहे. पण दोन - तीन दिवसात त्याच जागेवर खड्डा तयार झाल्याचे दिसत आहे.
पुण्यात दोन महिन्यातच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात शिवाजीनगरला झालेला पाऊस हा २०१२ नंतरचा सर्वाधिक आहे. यंदा जुलैमध्ये ३९४ मिमी पाऊस पडला. पुण्याची चार महिन्यांची पावसाची सरासरी ६३८ मिमी आहे. जून-जुलै महिन्यात सरासरी ३४६ मिमी असते, प्रत्यक्षात ६१६ मिमी पाऊस झाला आहे. आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.
खडकवासला धरणाच्या (khadakwasla dam) सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 9416 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 7:00 वा. 11407 क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा 11407 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 9:00 वा. 13981 क्यूसेक्स करण्यात आला आहे. दुपारी 2:00 च्या सुमारास 13981 क्युसेक्स विसर्ग वाढवून 16247 क्यूसेक्स करण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरण मिळून 26.46 टीएमसी पाणी जमा झाले असून 90.76 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
चार महिन्यांचा पाऊस दोन महिन्यांत
यंदा जून महिना कोरडा गेला, पण जुलै महिन्यात पाऊस चांगला बरसला. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने जून, जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. यंदा संपूर्ण हंगामाचा म्हणजे जून ते सप्टेंबर अखेर असा चार महिन्यांचा पाऊस दोन महिन्यांतच पडला. धरणे देखील भरली आहेत. यामुळे वर्षभराची पुणेकरांची तहान भागली आहे.