गराडे (पुणे): पश्चिम पुरंदर तालुक्यात पावसाने जोरदार धुमाकुळ घातला आहे. सायंकाळी ४.३० वा. सुरू झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने साडेसहा वाजेपर्यंत दोन तास अक्षरशः थैमान घातले. नद्या-नाले, ओढे यांना पूर येवून दुथडी पार करून पाणी तुडुंबपणे वाहत आहे.
आज पश्चिम पुरंदरमधील आस्करवाडी, पठारवाडी, नाटकरवाडी, भिवरी, गराडे, सोमुर्डी, वारवडी, दरेवाडी, दुरकरवाडी, बोपगाव, चांबळी, हिवरे, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, देवडी, केतकावळे, पोखर, कुंभोसी, भिवडी, सुपे, दिवे परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली आहे.
सायंकाळी चारच्या सुमारास सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला. त्यानंतर ढगफुटीसारख्या पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र वीज गेली होती. रस्त्यावर आलेल्या लाल गढूळ, वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे कित्येक तास वाहतूक खोळंबून राहिली. पावसाने शेतकरी, नागरिक यांची दाणादाण उडविली. जनजीवन विस्कळीत केले. यंदा अतिवृष्टीचा शेतीला जोरदार फटका बसला आहे.