पुणे : हवामान विभागाच्या मॉन्सूनच्या महिन्याची आजपासून सुरुवात झाली आहे. अनुकूल हवामान नसल्याने मॉन्सूनचे अजून केरळमध्ये आगमन झाले नसले, तरी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मंगळवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला.
सध्या पडत असलेला हा पाऊस पूर्वमोसमी पाऊस आहे. पुणे शहरात आज सायंकाळी शहराच्या काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी भुरभूर पावसाचा अनुभव आला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत कात्रज येथे २२ मिमी, खडकवासला येथे १२.५, वारजे ६.४, कोथरूड २.८ मिमी पाऊस झाला तर, शिवाजीनगर येथे ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहर व परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.