लोणावळा : अतिवृष्टीमुळे दोन दिवस लोणावळ्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत केलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी ( 17 जुलै) काहीसा कमी झाल्याने शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर साचलेले पाणी वाहून गेले आहे. रविवार व सोमवार या 48 तासात लोणावळा शहरात तब्बल 447 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी 285 मिमी व सोमवारी 162 मिमी पावसाची नोंद झाली. शहरात या मौसमात आज अखेरपर्यत 2553 मिमी (100.51 इंच) पावसाची नोंद झाली. मागील वर्षी शहरात आज अखेर 2290 मिमी (90.16 इंच) पाऊस झाला होता. विशेष म्हणजे मागील अवघ्या पंधरा दिवसात लोणावळा शहरात 1803 मिमी (71 इंच) एवढा पाऊस झाला आहे. पावसाची संततधार थांबली असली तरी काहीशी उघडीप घेत पावसाच्या जोरदार सरी सुरुच आहेत.
मागील बारा दिवसांपासून लोणावळ्यात सुरु असलेल्या पावसामुळे लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकल भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी लोणावळ्यातील सर्व सरकारी व खासगी शाळांना प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आली. मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला पूर आला असून वाकसईचाळ येथील इंद्रायणी व डेक्कन सोसायटीला पाण्याचा विळखा बसला आहे. सांगिसे वाडिवळे हा पुल पाण्याखाली गेला आहे तर नाणे मावळाला जोडणार्या पुलाच्या पुढील रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. लोणावळा शहरातील तुंगार्ली भागातील एका सोसायटीमध्ये पाणी घुसले तर नांगरगाव, भांगरवाडी, गवळीवाडा, रायवुड, वलवण या भागातील रहदारीचे रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. रायवुड, जुना खंडाळा व पवनानगर मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. भुशी धरणाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पर्यटकांनी धरण परिसरात तसेच धबधब्यांच्या खाली जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.