पुणे : पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून रस्त्यामधले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांनी पुणेकर त्रस्त झालेले दिसत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने त्यातून दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता.
शनिवार, रविवारनंतर सोमवारीही पुणे शहर आणि उपनगर भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरु असून आठवड्याची सुरुवातीलाच जनजीवन विस्कळीत होताना दिसून आले आहे. शहरात रविवारपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत २६.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.सकाळीही काही वेळ पावसाचा जोर कमी झाला होता़ दुपारी पुन्हा मुसळधार सरी येण्यास सुरुवात झाली़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ३८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ त्यानंतर पावसाने थोडीशी उसंत घेतली होती़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत ४०़४ मिमी पाऊस झाला़. रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद सोमवारी झाली आहे़ मंगळवारीही शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.
या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले आहे. त्यातच रस्त्यात साचलेले पाणी आणि खड्ड्यांमुळे छोट्यामोठ्या अपघातही बघायला मिळाले. सतत सुरु असलेल्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नदीपात्र, नळस्टॉप, सिंहगड रस्ता, पुणे स्टेशन, शिवाजीनगर भागात वाहतूक कोंडी बघायला मिळाली. वाहतूक कोंडीचा फटका पीएमटीलाही बसला असून बस उशिरा येत होत्या. त्यामुळे भर पावसात छत्र्या घेऊन नागरिक बसची वाट बघत असल्याचे जागोजागी दिसून येत होते. पावसामुळे काही प्रमुख चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती़ वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यावंर अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता़.शहराजवळच्या कोंढवे धावडे भागात दुकानांमध्ये शिरले असून अपूर्ण राहिलेल्या एनडीएरोडमुळे पाणी उतारावरून दुकानांमध्ये येत असल्याची प्रतिक्रिया संबंधित दुकानदारांनी दिली आहे. खडकवासला धरण परिसरात पर्यटकांनी पाणी बघण्यासाठी आणि पाऊस अनुभवण्यासाठी गर्दी केली होती.