सायंकाळी ५.४५ ते ६. ३० वाजण्याच्या सुमारास या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासमवेत गारपिट झाल्याने उसतोड कामगारांची धावपळ झाली. त्यांचे झोपड्यांमध्ये अचानक आलेल्या अवकाळीमुळे पाणी शिरून गृहपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांना तसेच फळ व पालेेभाजीला याचा मोठा फटका बसला आहे. या परिसरत मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जातेे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे गेले दोन दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बीमध्ये उशिरा पेरणी करणारा आणि पीक काढणी करणाऱ्या शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. कोलवडी - मांजरी खुर्द शिवेवर राहणारे उसतोड कामगारांच्या १२ ते १५ झोपड्यांमध्ये अचानक आलेल्या अवकाळीमुळे पाणी शिरल्याने त्यांना चिखलात रात्र काढणे अशक्य झाले होते. अबालवृद्धांची ही अडचण लक्षात येताच प्रभाकर क्षिरसागर यांनी सुमारे ३० ते ३५ जनांना आपल्या घरासमोर असलेल्या शेडमध्ये लाईट व पाणी याची व्यवस्था करून त्यांच्या निवा-याची व्यवस्था करून दिली.