पुणे : दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारनंतर पडलेल्या तासाभराच्या पावसाने शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नसल्याने अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळाले़ वारजे, कोथरुड, खडकवासला भागात जोरदार पाऊस झाला. सध्या ऑक्टोबर हीट सुरु झाला असून दिवसा शहरात प्रचंड उकाडा जाणवत होता.शनिवारी शहरात कमाल तापमान ३३. ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्यातच महावितरणच्या विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने शहरातील अनेक भागामधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता़ त्यामुळे नागरिकांना घरात कार्यालयात बसणे अशक्य झाले होते. तीव्र उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन आकाश दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वातीनच्या सुमारास अचानक ढगफुटीसारखा पाऊस कोसळू लागला. काही मिनिटातच रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले दिसून येत होते. कर्वे रोड नळस्टॉप चौक आणि म्हात्रे पुलाजवळील रिलायन्स मॉल येथे अर्धा रस्ता पूर्णपणे पाण्याने भरला होता. त्यातून वाहन जाणे शक्य नसल्याने पुलावरुन कर्वे रोडकडे येणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली होती.
शहरात पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फुटपाथाची लांबी वाढविण्यात आली. परंतु हे काम करताना पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणतीही जागा न ठेवल्याने अनेक रस्त्यांवर थोडा पाऊस झाला तरी पाणी साठत आहे. या वर्षी हे अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ११. ६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी आशय मेजरमेंटच्या नोंदीनुसार सायंकाळी ४ वाजेपर्यंत खडकवासला ३२ मिमी, वारजे ३६, कोथरुड ४४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पुढील काही दिवस शहरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.