बारामती - राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ९ जुलैपर्यंत भाटघर २५ टक्के, नीरा देवघर २६ टक्के, वीर २३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाळी आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बारामतीच्या बागायती परिसराला नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानली जाते. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर व परिसरात अल्पपाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडे बारामतीकरांच्या नजरा असतात.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९ जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. भाटघर धरण- ६१६४ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. तर सध्या या धरणात ३७६ द.ल.घ.फू.ने पावसाचे पाणी येत आहे. नीरा देवघर धरणात ३२०७ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. या धरणात २७२ द.ल.घ.फू.ने पाणी येत आहे. वीर धरणात २६१३ द.ल.घ.फू. पाणीसाठा असून, २१२ द.ल.घ.फू.ने धरणात पावसाचे पाणी येत आहे.पाटबंधारे खात्याचे बारामती उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की १३ मार्च ते २८ जूनपर्यंत नीरा डावा कालवा सुरू होता. गेल्या वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याची मिळाली. यंदादेखील शेतीला पाच आवर्तने देण्याची तयारी आहे. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येईल.२१५ दशलक्ष घनफूट नाझरेत पाणीसाठा...नाझरे धरणात सध्या २१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आॅक्टोबरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल. बारामती मोरगाव नळपाणीपुरवठा प्रादेशिक योजना या जलाशयावर अवलंबून आहे. बारामती तालुक्यातील आंबी बु, मोरगाव, तरडोली, लोणी पाटी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव, बाबुर्डी, आंबी खुर्द, काºहाटी, जळगाव क.प., जळगाव सुपे आदी गावांना नाझरे जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध पाणीसाठा या गावांसाठी आॅक्टोबरपर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे सध्यातरी पाणीटंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे.
नीरा खोऱ्यात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:52 AM