पुणे : कोकण, गोव्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्याचाच परिणाम पश्चिम घाटावरही दिसून येत आहे. पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. घाट परिसरातील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेले काही दिवस पुणे शहर व परिसरात पावसाने उघडीप दिली होती. अधून मधून पावसाची एखादी सर येत असे. गेल्या २४ तासांत भाेर येथे ४४.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. लवासा २७.५, राजगुरुनगर १२, नारायणगाव १०.५, लोणावळा ५ मिमी पाऊस झाला होता. अन्य ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली आहे.
पुणे शहरात रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. अधून मधून पावसाची एखादी जोरदार सर येत होती. त्यानंतर काही वेळातच ऊन पडलेले दिसत होते. श्रावणातील उन्हापावसाचा खेळ दिसून येत होता. त्यामुळे आता पाऊस पडणार नाही, असे वाटून घराबाहेर पडलेल्यांना काही वेळातच भिजण्याची वेळ येत होती. शहराच्या काही भागात लख्ख ऊन, तर दुसरीकडे जोरदार पाऊस असे चित्र रविवारी शहराच्या अनेक भागात दिसून आले. शहराच्या मध्य वस्ती पावसाने उघडीप दिलेली दिसत असतानाच पश्चिम भागात मात्र पावसाच्या जोरदार सरी पडल्या.
पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी रेड अलर्ट देण्यात आला असून, पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी शहरात २-३ जोरदार सरी येऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी तसेच मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.