पुणे : गेले ८ दिवस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस झाला़. दरम्यान, १३ व १४ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात १३ व १४ ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़.
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात शिरगाव ११०, ताम्हिणी ९०, अम्बोणे, दावडी ८०, महाबळेश्वर ७०, पौड मुळशी, माथेरान, डुंगरवाडी ५०, लांजा, चांदगड, गगनबावडा, लोणावळा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी ४०, भिरा, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, पोलादपूर, सावंतवाडी, सुधागड पाली, कोयना, वाणगाव, शिरोटा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़ मराठवाड्यातील देगलूर १० मिमी तर, विदर्भातील पारशिवनी, शिरोंचा, यवतमाळ १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ .इशारा : १३ ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ .
१४ ऑगस्टला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
१५ व १६ ऑगस्टला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.