पुणे : पुणे शहराला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपले. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभर घामेघूम झालेल्या सायंकाळी पुणेकरांना वरूणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगली तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारपासून शहरातील कमाल तापमानाचा आकडा चाळीशीमध्ये पोचला होता. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळया अंगाला झोंबत होत्या. तसेच किमान तापमानही २० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगली तारांबळ उडाली. पुढील पाच दिवस अजून दुपारी आकाश निरभ्र असेल आणि सायंकाळनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आज्जि पावसाने हजेरी लावली. आज सकाळापासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच पावसाची चिन्हेही दिसू लागली होती. अखेर सायंकाळी ६.३० च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
हवामान खात्याचा इशारा
-ढगांच्या गडगडाटावेळी झाडाखाली आसरा घेऊ नये- विजेच्या काळात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नये- जोरदार वारा असल्याने खिडक्या व दारे बंद ठेवा- वाहने सुरक्षित चालवा, कारण पावसाने दृश्यमानता कमी होऊ शकते
तापमानाचा पारा चाळीशीत
कोरेगाव पार्क : ४०.३वडगावशेरी : ३९.८
मगरपट्टा : ३९.५हवेली : ३८.३
शिवाजीनगर ३७.९एनडीए : ३७.८
पाषाण ३७.३
पावसाची नोंद
कात्रज आंबेगाव : १४ मिमी
खडकवासला १८.२ मिमीवारजे : १२ मिमी
रस्ता पाण्याखाली
कोथरूड डेपोजवळील मेट्रोच्या शेजारी गुरूवारी सायंकाळी झालेल्या पावसाने गुडघाभर पाणी साठले होते. संपूर्ण रस्ताच पाण्याखाली गेला होता. त्यामुळे काही जणांच्या दुचाकी त्या ठिकाणी बंद पडल्या.
झाडपडीच्या घटना
पाऊस व वारा यामुळे अग्निशमन दलाकडे कोथरुड, एरंडवणा, बावधन, औंध, बाणेर येथून झाडपडीच्या ७ तर कोथरुड डेपो, शास्त्रीनगर येथे बसवर फलक पडल्याची घटना घडली आहे. एरंडवणा, कलमाडी हाऊस जवळ मोठा लोखंडी कॉलम पडण्याच्या स्थितीत असल्याची तक्रारही अग्निशमन दलाकडे आली. कलमाडी हाऊसजवळ इमारतीवर कॉलम पडला.