लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मॉन्सूनने गेल्या १५ दिवसांहून अधिककाळ ओढ दिली असल्याने सर्वांचे डोळे पावसाच्या जोरदार आगमनाकडे लागले आहेत. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील ५ जिल्ह्यांत दुष्काळसदृशस्थिती निर्माण होऊ लागली आहे. अकोला, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या ५ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाऊसमान घटले आहे.
राज्यात १९ जूनपासून पावसाने ओढ दिली आहे. एरवी कोकणात या महिन्यात नेहमीच जोरदार पाऊस पडत असतो. मात्र, त्या ठिकाणीही यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. मध्य महाराष्ट्रातही आता पावसाने ओढ दिल्याने येथील अनेक जिल्ह्यांमधील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा (-५) टक्के कमी पाऊस झाला आहे. त्याचवेळी मराठवाड्यात आतापर्यंत २१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भात ५ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी)
मुंबई उपनगर (३५), सातारा (३२), सोलापूर (३२), औरंगाबाद (२४), बीड (२७), भंडारा (३१), चंद्रपूर (२३), नागपूर (२१), वर्धा (२२), उस्मानाबाद (३३), परभणी (३८), जालना (३६)
सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी)
रायगड (१), रत्नागिरी (१६), सिंधुदुर्ग (६), अहमदनगर (१२), कोल्हापूर (१०), सांगली (६), लातूर (६), नांदेड (११), वाशिम (१०), यवतमाळ (१६)
सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (उणे टक्केवारी)
मुंबई शहर (-२), पालघर (-११), पुणे (-३), हिंगोली (-४), अमरावती (-४), गडचिरोली (-३), गोंदिया (-१३)
सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कमी पाऊस झालेले जिल्हे (उणे टक्केवारी)
धुळे (- ४६), जळगाव (-२९), नंदुरबार (-५७), नाशिक (-३७), अकोला (-५०), बुलढाणा (- २४).