पुणे, दि. 20 - पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. या हंगामात सोडलेले हे सर्वाधिक पाणी असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यातील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. मुळा नदीहीही दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवार (19 सप्टेंबर) पासून पुन्हा एकदा पावसाला दमदार सुरुवात झाली. पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून, खडकवासला धरणातून मुठेत २३ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाची संततधार सुरूच असून, ती अशीच राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्याची गरज भासू शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.मंगळवारपासून सुरु असलेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळीत वाढ झाली आहे. मुठा नदीतून काल रात्रीपासून टप्याटप्याने पाणी वाढविण्यात आले. सध्या २३ हजार ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव धरणातूनही सोडलेले पाणी खडकवासल्यात येत आहे. धरणात जवळपास २५ हजार क्युसेक्स वेगाने पाणी जमा देखील होते आहे. त्यामुळे ही संततधार अशीच सुरु राहिल्यास विसर्ग वाढवावा लागणार आहे.
मुळा नदीतही मुळशी धरणातून पाणी येत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २०२ २०५५०१२६९ / २५५०६८०० / २५५०६८०१ / २५५०६८०२ / २५५०६८०३/ २५५०६८०४ या क्रमांकावर, तसेच अग्निशमन दलाच्या मदतीसाठी १०१ या क्रमांकावर, पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी १०० या क्रमांकावर तसेच ०२० २५५०११३३ / २५५०११३० या क्रमांकावर सुरक्षा रक्षकांच्या मदतीसाठी संपर्क करता येणार आहे. ही सेवा २४ तास सुरू आहे.