पुणे: शहरात रात्रीपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे येरवडा, विश्रांतवाडी, कल्याणीनगर,विमाननगर,परिसरात प्रशासन, नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे पडल्यााच्या घटना घडल्या आहेत. कल्याणीनगर या ठिकाणी दुधाच्या जीपवर तर एअरपोर्ट रोड व हरी गंगा सोसायटी समोर चारचाकी वाहनांवर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. कल्याणीनगर येथील घटनेत जीप चालक जखमी झालेला आहे. घटनाचे पुणे महापालिका अग्निशमन दल व उद्यान विभागाच्या वतीने कोसळलेली झाडे रस्त्यावरून दूर करण्याचे काम सुरू आहे.कल्याणीनगर येथील आगाखान पॅलेस शेजारील रस्त्यावर दुधाचे कॅन घेऊन जाणाऱ्या जीप क्र. (एम एच 12 पी 38 05) मोठे बाभळीचे झाड कोसळल्याची घटना बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मधील चालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी येरवडा अग्निशामक दलाचे फायरमन रघुनाथ भोईर, उमेश ढगळे, राजू आल्हाट, सोपान पवार हे दाखल झाले असून जीपवर कोसळलेले बाभळीचे झाड आवश्यक यंत्र सामग्री च्या मदतीने हटविण्याचा प्रयत्न भर पावसात सुरु आहे. गुंजन चौकाजवळ एअरपोर्ट रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच समोर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड एका चार चाकी वर कोसळले. या गाडीत 3 व्यक्ती होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. तर आरटीओ फुलेनगर जवळ हरी गंगा सोसायटी समोर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड कोसळले. यामुळे अग्रेसन हायस्कूल कडून आरटीओ फुलेनगर कडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता.सुमारे तासाभरानंतर महापालिका उद्यान विभागाच्या जेसीबीने कोसळलेले हे झाड रस्त्यातून दूर केले. येरवडा, विश्रांतवाडी व परिसरात आज सकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. पुणे महापालिका अग्निशमन दल व उद्यान विभागाच्या वतीने रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.
येरवड्यात पावसाने उडवली दाणादाण, प्रशासन आणि नागरिकांची उडाली धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 6:16 PM