पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६३२ गावांतील २२ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामुळे ४० हजार ७४५ शेतकरी बाधित झाले आहेत. जुन्नर, बारामती, पुरंदर आणि मावळ या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन, द्राक्ष या पिकांना अधिक हानी पोहोचली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बी. जी. पलघडमल यांनी दिली. जून ते ऑक्टोबरअखेरीस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. उलट, काही तालुक्यांत ओला दुष्काळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मावळ, मुळशीसह काही तालुक्यांत सरासरीपेक्षा ४० ते ५० टक्के अधिक पर्जन्यमान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. शेतमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केलेल्या पाहणीत डाळिंब, द्राक्षे, कांदा, भुईमूग, मका, फुलपिके, भात, बाजरी, बटाटा, ऊस, तृणधान्य, गळीत धान्य, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ११५ गावांमधील २४ हजार २६० शेतकरी बाधित असून, त्यांच्या १५ हजार ३६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. खालोखाल बारामतीमधील ७८ गावांतील ३,६०० शेतकºयांचे १,८२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यात २९८ हेक्टर ऊसक्षेत्राचा समावेश आहे, तर मावळ तालुक्यातील १३२ गावांमधील ३ हजार ६७९ शेतकºयांचे १ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. भोर आणि वेल्हे या तालुक्यांत तुलनेने कमी नुकसान झाले आहे. भोर तालुक्यातील २८ गावांमधील १५२ शेतकरी बाधित असून, ३२ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. वेल्हा तालुक्यातील २२ गावांमधील ७३ शेतकºयांचे १९ हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. हवेली तालुक्यामधील ६ गावांतील ४८४ शेतकºयांचे १३ हेक्टरवरील भुईमूग, ५५ हेक्टरवरील सोयाबीन आणि १०७ हेक्टरवरील भाजीपाला असे १७५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसानामध्ये भाजीपालापिकाचे सर्वाधिक ७ हजार २५१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. खालोखाल सोयाबीनचे साडेचार हजारांहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे..........भाजीपाला-फळांचे झालेले नुकसान हेक्टरमध्येडाळिंब १९५द्राक्षे १२६७केळी १२कांदा १०३१भुईमूग २४३४मका ८७फुलपीक ३०२इतर पिके ३१९भात ३३०९सोयाबीन ४६८६बाजरी १४१बटाटा २०२ऊस २९९गळीत धान्य ४९भाजीपाला ७२५१
अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ६३२ गावे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 12:11 PM
२२ हजार हेक्टरचे झाले नुकसान : जुन्नर, पुरंदर, बारामती, मावळात सर्वाधिक नुकसान..
ठळक मुद्दे भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन, द्राक्ष या पिकांना अधिक हानी पोहोचली असल्याची माहिती