पुणे : पुणे शहरासह उपनगर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटेही शहरातील अनेक भागात पाऊस झाला होता. त्यातच दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला असून शहरातील विविध पेठांसह कोथरूड, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी या उपनगर भागातही पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट सुरु होता. सध्या देशात कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे, त्याचा परिणाम म्हणून जास्त संख्येने नागरिक रस्त्यांवर नाहीत.
पुण्यात सिंहगड रस्ता, बुधवार पेठ, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, कात्रज, वारजे भागात तर ग्रामीण भागात मुळाशी, भूगाव, बावधन पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे ग्रामीण भागात कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असून त्यामुळे पिकावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अवकाळी पावसामुळे ज्वारी आणि गहू पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे बघायला मिळाले.