भोर : भोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील दरडी, झाडेझुडपे, दगड, माती, कोसळून लागवड केलेले भात, नाचणी ही पिके दगड-मातीने गाडून गेल्याने आणि पाण्याने वाहून जाऊन ताली पडून पिकांसह भात खाचरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भात पिकांवर अवलंबुन असलेली कुटुंब उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे शासनाने शेतीचे खाचरांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी अडचणीत सापडलेला शेतकरी करीत आहे.
भोर तालुक्यात तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील निरा-देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील रायरी, कंकवाडी, धारांबे, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खुर्द, गुढे, निवंगण माझेरी, शिरवली, कुडली बु,. कुडली खुर्द, दुर्गाडी, शिरगाव शिळींब, उबार्डेवाडी, अशिपी, कुंड, राजिवडी, साळुंगण, पांगारी, हिर्डोशी, वारवंड, कारुंगण, कोंढरी, म्हसर बु., म्हसर खु., करंजगाव यांसह वीसगाव खोरे, भाटघर धरण भागातील भुतोंडे खोरे या भागातील गावात डोंगरातील दरड माती मोठमोठी झाडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येऊन खाचरात आल्याने खाचरातील लावलेले भात पीक गाळाने गाडली आणि भात पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले. नाचणी पीक वाहून नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे खाचरांच्या भगदाड पडून मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाताची लागवडी केली नाही. त्या खाचरात दगड, माती, झाडे आल्यामुळे खाचरे लावण्यासारखी आवस्था राहिलेली नाही.
दरम्यान, तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची तर, १५०० हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाते. तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकाशिवाय कोणतेही पीक होत नसून पावसाच्या लहरीपणावरच भात पीक अवलंबून आहे. म्हणजे पाऊस नाही पडला तरी भात पिकत नाही, पाऊस अधिक झाला तरीही भात पिकाचे नुकसान होते. या वेळी पावसामुळे तालुक्यात सुमारे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे भाताच्या पिकावर अवलंबून असलेले संसार उघड्यावर येऊन उपासमार होईल, अशीच आवस्था आहे. पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान
पावसामुळे भात खाचरांच्या वाहून गेलेल्या दगडी ताली, खाचरात पडलेले दगड, गोटे, गाळ, माती, झाडेझुडपे बाहेर काढायला बैलजोडीचा उपयोग नसून जेसीबी किंवा मोठ्या यंत्राचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी होणार खर्च लाखो रुपयांच्या घरात आहे. सदरचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तर अनेकांची भात खाचरे दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेली आहेत. ती कधीच दुरुस्त होणार नाहीत. यामुळे आयुष्यभर ज्या शेतीवर संसार उभे राहिले ती खराब झाली आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील भुईमूग, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, भाजीपाला पिकांचेही पावसाने मोठे नुकसान झालेले आहे.
भात पीक नुकसान फोटो