ओतूर : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बरसलेल्या पावसाने मागील दोन आठवड्यांपासून दाडी मारली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने 'यलो अलर्ट'चा इशारा दिला होता. दिवसांच्या पावसाच्या अंदाजाचे ढग आले, मात्र बरसले नाही. पावसासाठी तहानलेल्या ओतूर व परिसरातील गावातील लोकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा असताना मुसळधार तर नाही, मात्र घामाच्या धारांनी ओतूर व परिसरातील लोक बेजार होत आहेत.तालुक्यात पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. ऊन-पावसाच्या या लपंडावात घामाच्या धारा, खंडित वीजपुरवठ्याने माळशेज परिसराच्या गावातील लोक त्रस्त झाले आहेत.
प्रादेशिक हवामान खात्याने पुन्हा दोन दिवसांचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मात्र, मागील चार दिवसांचा अनुभव बघता या दोन दिवसांत तरी तालुक्यात पावसाच्या सरी बरसतील की नाही, याची शाश्वती नाही. मंगळवार, बुधवार दिवसभर दमट वातावरण व उकाड्याने घामाच्या धारांनी भिजविले. दुपारच्या वेळी सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. तर, काही ठिकाणी तुषार पडल्यासारखा पाऊस झाला. मात्र, मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही प्रतीक्षाच ठरली. आतापर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली आहे. १०० मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. मात्र, जून महिन्याच्या शेवटी बरसलेला पाऊस व जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, रुसलेल्या वरुणराजाने मात्र दांडी मारली आहे. पावसाचा पत्ता नसतानाही माळशेज वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार मात्र वाढले आहेत. पावसाचा सुरू असलेला लपंडाव यामुळे ओतूर परिसराच्या गावातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. कारण विहिरीचे, बोअरवेलचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
माळशेज परिसरात तुरळक पाऊस झाला होता. त्या पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी महागामोलाचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. आता उतार झाला परंतु तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस हवामान खात्याचा अंदाज चुकत गेल्याने आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे करण्याची वेळ येते की काय असे वाटू लागले आहे. हवामानतज्ज्ञांनी पावसाविषयी केलेला अंदाज शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणारा ठरत आहे. प्रत्येक हवामानतज्ज्ञांनी वर्तविलेले अंदाज यावेळी पूर्णता चुकीचे ठरले आहेत. हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, आज रोजी पाऊस न आल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.