हंगामातील माॅन्सूनपूर्व पहिल्या पावसाचे आगमन
लोकमत न्यूज नेटकर्व
शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२९) मान्सूनपूर्व वळवाच्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे हंगामातील पहिल्याच माॅन्सूनपूर्व पावसाने शेतात पाणीच - पाणी केले.
पावसापूर्वी वादळी वाऱ्याने परिसरात थैमान घातल्याने नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. सुसाट वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे माॅन्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
गेल्या चार - पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने उकाडा अधिक वाढत होता. वाढत्या उकाड्याचे पावसात रुपांतर होईल असे अपेक्षित होते. अखेर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात जमून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी विजांच्या कडकडाटात बरसण्यास सुरुवात केली. एक तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरात शेतांचे बांध फोडले.
खरीप हंगामातील प्रारंभीच्या मृग नक्षत्राला ८ जूनला प्रारंभ आहे. त्यामुळे वरुणराजाची होणारी कृपा शेतीची मशागत करण्यासाठी तसेच धरणीमातेची तहान भागविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्याची भावना बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे.
फोटो ओळ : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात शनिवारी (दि.२९) मॉन्सूनपूर्व वळवाच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणीच - पाणी झाले. (छाया : भानुदास पऱ्हाड)