पाटेठाण (पुणे): राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका दौंड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बसला असून पिलाणवाडी (ता.दौंड) येथे मेंढपाळांच्या पालातील मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवार (दि.०२) रोजी सांयकाळच्या सुमारास घडली. अचानक कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे मेंढपाळ वर्ग हतबल झाला असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
पिलाणवाडी येथील मेंढपाळ दत्तात्रय किसन डुबे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करत आहेत. दोन दिवस अवकाळी पाऊस होत असल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. मेंढपाळांचा उघड्यावर मुक्काम असल्यामुळे प्रचंड थंडाव्याने बकरे आणि शेळ्या गारठल्या आणि त्यातच पंधरा मेंढ्या जागीच मरण पावल्या आहेत. घटनास्थळी सरपंच वैशाली डुबे, उपसरपंच संगीता चांदगुडे, पशुवैदयकीय अधिकारी अनिल इंगोले, गावकामगार तलाठी आनंद ढगे यांनी धाव घेऊन मूत्यूमुखी पडलेल्या मेंढयाचे पंचनामे केले तसेच आजारी असणाऱ्या शेळया मेंढयावर उपचार करण्यात आले.
मेंढयाना थंडीपासून बचाव करण्यासाठी मेंढपाळाना माहिती देऊन स्थानिक ग्रामस्थांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेंढपाळ दत्तात्रय डुबे यांनी केली आहे.