लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इतके दिवस कोकणात धुवांधार पडत असलेल्या पावसाने कालपासून सह्याद्री पर्वतरांगा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार आगमन केले. खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. ताम्हिणी, लोणावळा, वळवण परिसरात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली. पुढील २४ तासात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहर व जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ४.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे या हंगामातील सर्वाधिक ३९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दावडी ४७०, डुंगरवाडी ४१० मिमी पाऊस पडला होता. शिरगाव ३७०, लोणावळा, वळवण, भिरा ३४०, अम्बोणे, कोयना (पोफळी) ३२०, खोपोली ३१० मिमी पावसाची सकाळपर्यंत नोंद झाली होती.
शहर व जिल्ह्यात बुधवारी (दि २१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. ग्रामीण भागात जोरदार झालेल्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले. आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृष्य पावसामुळे पोखरी घाटात दरड कोसळल्याने भिमाशंकर रस्ता बंद झाला होता. अनेक ठिकाणी बंधारे फुटल्याने भातशेतीचे नुकसान झाले. भोर तालुक्यात जवळपास सात ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे भोर-महाड रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक महत्वाचे रस्ते हे पाण्याखाली गेले होते. खेड तालुक्यातील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून ३ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील नद्यांना पुर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी तालुक्यास्तरीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
चौकट
घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
पुणे शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ५.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाषाण ११.४, लोहगाव ६.२ मिमी पाऊस झाला आहे. खडकवासला परिसरात २०, वारजे १७.८, कोथरुड ६ तर लोणी काळभोर येथे ०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहर व परिसरात उद्या दिवसभरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.