पुणे : देशात यंदा थंडीचा कडाका वाढला असून हिमालयीन पर्वत रांगा, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीही खूप होत आहे़ देशातील हवामानाचा अनुकूल-प्रतिकूल परिणाम पुण्यात दिसून येतो, हे पुन्हा एकदा अनुभवायला येत असून या हंगामात प्रथमच पुण्यात १२ दिवस थंडीचा कडाका कायम राहिला आहे़
सध्या हवामान एकदम कोरडे आहे़ त्यामुळे उष्णतेचे उत्सर्जन होताना त्याला अडथळा येत नसल्याने सायंकाळनंतर थंड वारे वाहण्यास लागून तापमानात अचानक घट जाणवते. सातत्याने किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक दिवस खाली राहत असल्याचे यंदा अनेक वर्षांनी प्रथमच जाणवत आहे़ उत्तरेत यंदा थंडीचा कडाका वाढला असून, त्यामुळे थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे़ त्याचा परिणाम यंदा राज्यातील अनेक भागात नेहमीपेक्षा अधिक दिवस थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात दर वर्षी डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढतो़ तो साधारण तीन ते चार दिवस सलग असतो, असा आजवरचा अनुभव आहे; पण यंदा हा कालावधी वाढलेला दिसून येत आहे़ २६ डिसेंबर रोजी पुण्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस होते़ त्यानंतर १७ डिसेंबरला १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते़ त्यानंतर सातत्याने किमान तापमान १० अंशांच्या खाली राहत आले आहे़ २९ डिसेंबरला १२ वर्षांतील सर्वांत कमी किमान तापमान ५़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यानंतर ६ जानेवारीला १०़३ अंश सेल्सिअसचा अपवाद वगळता ९ जानेवारीपर्यंत कायम किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा घट झालेली दिसून येत आहे़ सलग इतके दिवस ही स्थिती प्रथमच दिसत असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ जानेवारीपर्यंत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे़कोरड्या हवेचा परिणामसध्या उत्तरेकडील थंड हवेचा दाब अधिक असल्याने त्याचा परिणाम राज्यासह पुण्यातील किमान तापमानावर दिसून येत आहे़ पूर्वेकडून वारे वाहत असले तर त्याच्याबरोबर बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन हे वारे येतात़ त्याचा परिणाम होऊन दमट वारे आल्यास तापमानात वाढ होते; पण सध्या उत्तरेकडील थंड वारे आणि अत्यंत कोरडे हवामान यामुळे थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे़- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी,ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञगेल्या काही दिवसांतील पुणे शहरातीलकिमान तापमान (कंसात)२६ डिसेंबर (१४), २७ डिसेंबर (१०), २८ डिसेंबर (७़४), २९ डिसेंबर (५़९), ३० डिसेंबर (६), ३१ डिसेंबर (६़९), १ जानेवारी (७़६), २ जानेवारी (७़९), ३ जानेवारी (८़४), ४ जानेवारी (८़८), ५ जानेवारी (९़१), ६ जानेवारी (१०़३), ७ जानेवारी ( ९़२), ८ जानेवारी (८़८), ९ जानेवारी (८).