लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेले काही दिवस पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी (दि. १६) सायंकाळपासून पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. हर्णे, राजापूर, गगनबावडा, कोयना, महाबळेश्वर येथे अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शुक्रवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी गेल्या २४ तासांत हर्णे, राजापूर २००, चिपळूण १७०, वैभववाडी १६०, कणकवली, खेड, वाल्पोई १५०, कुडाळ, लांजा, मुळदे, पेडणे १३०, संगमेश्वर, देवरुख ११०, माणगाव, मुंबई, मुरुड, श्रीवर्धन १००, देवगड, म्हापसा, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वेंगुर्ला येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली होती.
मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा २८०, महाबळेश्वर २१०, आजरा १८०, राधानगरी १७०, चांदगड १६०, गडहिंग्लज, कराड, कोल्हापूर, सांगली ९०, शाहुवाडी, यावल ७०, वेल्हे ६० मिमी पाऊस झाला.
मराठवाड्यातील सोयेगाव ६०, औंधा नागनाथ, भूम, कळंब, मुदखेड, शिरूर कासार, सोनपेठ, वाशी ३० मिमी पाऊस पडला.
विदर्भातील अकोला ४०, चिखली ३० मिमी पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.
घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) २३०, डुंगरवाडी, ताम्हिणी ११०, धारावी १००, दावडी ८०, कोयना (नवजा), खंद, भिवपूरी, भिरा ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे १२, लोहगाव ८, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ६६, सांगली १२, सातारा ५०, मुंबई १६, सांताक्रूझ ५८, अलिबाग ५, रत्नागिरी २०, पणजी ६, डहाणू ८५, परभणी १४, अमरावती २ आणि नागपूर येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी १८ जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या तीनही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.