आळंदी: आळंदीसह आजूबाजूच्या गावांमध्ये शनिवारी रात्री मेघगर्जनेसह ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. दोन तासांहून अधिक काळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील शेततपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द हद्दीत नैसर्गिक ओढा बुजविल्याने शेतकरी पांडुरंग थोरवे व धनंजय थोरवे यांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले. परिणामी जनावरांना पाण्यातच ताटकळत उभे राहून रात्र काढावी लागली आहे.
आळंदी शहरालगत असलेले चऱ्होली खुर्द गाव विकसित होत आहे. जमिनींना चांगले भाव आले आहेत. त्यामुळे गावात प्लॉटिंग पाडण्याचा सुळसुळाट झाला आहे. मात्र शेतजमिनींमध्ये प्लॉटिंग करताना नैसर्गिक पाणी प्रवाहाचे ओढे, नाले, तलाव संबंधित प्लॉटिंग व्यावसायिकांकडून बेकायदेशीर रित्या बुजविले जात आहेत. स्थानिक नागरिकही आर्थिक फायद्यासाठी ओढे बुजवत आहेत. संबंधित प्रशासनही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना फोफावत चालल्या आहेत.
दरम्यान शनिवारी आळंदीसह आसपासच्या गावांमध्ये मुसळधार झाला. त्यातच चऱ्होली खुर्द!! हद्दीतील नैसर्गिक ओढा बुजवल्याने पुराचे पाणी अनेकांच्या घरात, जनावरांच्या गोठ्यात शिरले आहे. त्यामुळे संबंधितांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. प्रशासनाने लक्ष घालून संबंधित नैसर्गिक ओढा अतिक्रमण मुक्त करून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.