पुणे \ पिंपरी : पुणे,पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचनंतर शहरातील वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. सव्वासहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पिंपरीत तर काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला.येत्या काही दिवसांत हवामान विभागाने पर्जन्य वृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे शहरात सिंहगड रस्ता, कोथरूड, डेक्कन, या परिसरात
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुणे आणि पिंपरीत शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळी सहानंतर दुकाने बंद करण्यात येतात. ही दुकाने बंद करण्याची लगबग सुरू होती तसेच चाकरमान्यांची देखील घरी जाण्याची तयारी सुरू असतानाच बुधवारी पावसाच्या मुसळधार सरींचे आगमन झाले. त्यामुळे दुकानदार तसेच चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दुचाकी चालकांची कसरत झाली. पावसाच्या अंदाजाने काहीजण रेनकोट, छत्री या तयारीसह घराबाहेर पडले होते.
बुधवारी दिवसभर कडक ऊन असल्याने असह्य उकाडा जाणवत होता. मात्र पावसाच्या आगमनामुळे सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला. यावेळी गारांचा वर्षाव देखील झाला. त्याचा अबालवृद्धांनी आनंद घेतला. सुमारे अर्धा तास पाऊस झाला.
विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर -दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतचा भाग ते कॉमोरीन क्षेत्र व लगतच्या भागापर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमार्गे पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिणेतील अनेक राज्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे. दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचे राहण्याची शक्यता आहे.