लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्नाटक किनारपट्टीपासून मराठवाड्यापर्यंत निर्माण झालेल्या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह अवकाळी पाऊस होत आहे. पुण्यातही रविवारी सायंकाळी शहराच्या अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहराच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. तर मध्य वस्तीत पावसाचा केवळ शिडकावा झाला. खडकवासला येथे सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५.८ मिमी पावसाची नोंद झाली.
बदलत्या हवामानाचा परिणाम शनिवारपासून शहरात दिसून येत होता. शनिवारी काही वेळ आकाश ढगाळ होते. रविवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. दिवसाच्या तापमानात घट झाली, तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडा चांगलाच वाढला होता. सायंकाळी आकाश ढगांची एकच गर्दी झाली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहराच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली. मध्य शहरात पावसाचा केवळ शिडकावा झाला. बिबवेवाडी, पाषाण, बाणेर भागात पावसाची हलकी सर येऊन गेली.
२२ ते २४ मार्च असे पुढील तीन दिवस शहरात आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
........
वारज्यात पावसाची १५ मिनिटे हजेरी
वारजे, शिवणे, कर्वेनगर व उत्तमनगर परिसरात रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटे हलक्या पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्ते भिजल्याने काही ठिकाणी निसरड्या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरल्याच्या एक दोन घटना वगळता वाहतूक सुरळीत होती. अचानक आलेल्या पावसाने संध्याकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांची मात्र धावपळ उडाली. वारजे परिसरात मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ढगांचा जोरदार गडगडाट होत होता. पाऊस मात्र अगदी कमी पडला.
उकाड्याने हैराण झालेल्या हडपसरवासियांना थंडगार वाऱ्याचा दिलासा
मागील दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून सकाळपासूनच ढगाळ वातावरणात दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच सायंकाळी सहानंतर पुन्हा पावसाने सुरूवात केली. पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. रविवार साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने कामगार-कष्टकरी मंडळी भाजी मंडईमध्ये सायंकाळच्या वेळी खरेदीसाठी गर्दी करतात. खरेदी सुरू असताना हलक्या पावसाच्या सरी सुरू झाल्याने विक्रेते आणि खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे खरेदीदारांनी उड्डाण पुलाच्या खाली, तर अनेकांनी दुकानांचा आडोसा घेतला. मात्र, विक्रेत्यांनी डोक्यावर कापड घेऊन जागीच थांबणे पसंत केले होते. अर्ध्या-पाऊण तासाच्या हलक्या पावसाने पुन्हा उघडीप दिली आणि भाजीविक्रेत्यांसह खरेदीदारांनी रस्त्यावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.