लोणावळा : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. वीकेंडमुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (24 फेब्रुवारी) वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे भल्या पहाटेच पुण्याकडे जाणार्या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रात्रीपासून या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वेग मंदावला होता. त्यातच अनेक मोठ्या गाड्या जागेहून पुढे जात नसल्यानं वाहनांचे चालक तेथेच झोपी गेल्यानं वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवार (24 फेब्रुवारी) व रविवार (25 फेब्रुवारी) अशा दोन दिवस सुट्या असल्याने अनेक पर्यटकांनी पर्यटनाचा बेत आखत सकाळच्या सत्रात घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढून द्रुतगतीवर वाहतूक कोंडी झाली आहे.
सलग सुट्या व वाहतूक कोंडी हे जणू काही द्रुतगती मार्गावरचे एक समीकरणच बनले आहे. दैनंदिन घाट क्षेत्रात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता शासनाने काही पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.