पुणे : नळस्टॉप चौकात उड्डाणपूल उभारल्यानंतर दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळात होणारी कोंडी सोडल्यास अन्य प्रश्न मिटले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी व अन्य प्रयोग करावे, तसेच खासगी वाहतूक वॉर्डनही नेमावेत, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी प्रशासनाला केली.
महापालिका आणि महामेट्रोतर्फे नळस्टॉप परिसरातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हा शहरातील पहिला दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, हा उड्डाणपूल उभारल्यानंतर कोंडीत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी सायंकाळी या चौकाला भेट देत कोंडीची पाहणी केली. यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, महामेट्रोचे संचालक गौतम बिऱ्हाडे, मनपा पथविभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, कर्वे रोड व्यापारी संघाचे ओमप्रकाश रांका, राजू भटेवरा, दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.
‘कर्वे रस्त्यावरील बसथांबे पुढे सरकवणे, पथपदाची रुंदी कमी करून वाहनांसाठी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध करून देणे, मेट्रोचा राडारोडा उचलणे अशा काही उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी गरज असल्यास तीन महिन्यांसाठी खासगी वॉर्डन नेमावेत. त्यांचे वेतन द्यायचीही आमची तयारी आहे,’ असे पाटील म्हणाले.
‘पुलाचे काम झाल्यानंतर नळस्टॉप चौकातील कोंडी ९० टक्के सुटली असून, विधी महाविद्यालयाकडून कर्वे रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांनाच कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यासंदर्भातील त्रुटी दूर केल्या जातील,’ असे मोहोळ म्हणाले.