उंड्री : कात्रज-मंतरवाडी बायपासवर उरुळीदेवाची व औताडे-हांडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्याप्रमाणावर अवजड वाहने उभी केली जात आहेत. ज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उरुळीदेवाची व औताडे-हांडेवाडी या दोन ग्रामपंचायत हद्दीतून जात असलेल्या कात्रज-मंतरवाडी बायपासच्या कडेला अवजड लोखंडी वस्तू जसे सळई, पाईप, पत्रे, इ. मोठमोठी गोदामे व दुकाने आहेत. या दुकानातून व गोदामातून दररोज मोठ्या प्रमाणावर या अवजड वस्तूंची आवक-जावक होत असते.बाहेर ठिकाणाहून अवजड माल घेऊन आलेली वाहने बऱ्याच वेळा बायपासच्या कडेला उभी असतात. जोपर्यंत या वाहनामधील माल खाली केल जात नाही, तोपर्यंत ही वाहने बायपासच्या कडेला धोकादायक रीतीने उभी केली जात आहेत. बऱ्याच वेळा माल घेऊन येणारे ट्रक हे रात्रीच्या वेळी येत असतात. तसेच, माल खाली केल्यावरही जोपर्यंत हिशेब होत नाही तोपर्यंत सुध्दा ही रिकामी वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. बायपासवर रात्रीच्या वेळी दिव्याची व्यवस्था नसल्याने धोका अजून गंभीर ठरू शकतो.तसेच, माल विक्रीसाठी पाठवतानासुद्धा माल भरलेली अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. अवजड चारचाकी वाहनांच्या माल ठेवण्याच्या हौदापेक्षा या सळई, पाईप या अवजड वस्तूंची लांबी जास्त असते. अशा वेळी असे भरलेले ट्रक इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. हौदापेक्षा बाहेर आलेल्या वस्तूचे भाग इतर वाहनांना सहजपणे दिसू शकतील अशा कायदेशीर आवश्यक उपाययोजना अवजड वाहनाच्या मालकांकडून केल्या जात नाहीत. यामुळे राजरोजपणे रस्त्याच्या कडेला धोकादायकपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली जावी, अशी अपेक्षा इतर वाहनचालक करीत आहेत.(वार्ताहर)
अवजड वाहने; अपघाताला निमंत्रण
By admin | Published: April 24, 2017 5:03 AM