दावडी : मंगळवार... सकाळचे ११ वाजलेले... निमगाव परिसरात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत उतरले आणि वृद्ध, तरुण डोंगरावर झाडाझुडपांतून मिळेल त्या मार्गाने धावत सुटले. मात्र, कोणालाही काहीही माहिती न देता हे पथक निघून गेले. त्यामुळे ते नेमके कशासाठी आले, याबाबत दिवसभर खेड तालुक्यात चर्चा रंगली होती. या संदर्भात प्रांत व पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र काहीही माहीत नसल्याचे सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी : सकाळी ११च्या सुमारास एक हेलिकॉप्टर या परिसरात घिरट्या घालत होते. ते थापा डोंगराच्या सपाट जमिनीवर उतरले. हेलिकॉप्टर पडले की काय? विमानतळ जागेची पाहणी करण्यासाठी तर आले नसावे ना? अशा शंका ग्रामस्थांना येऊन ते त्या दिशेला पळत सुटले. हे हेलिकॉप्टर येथे थांबून पथकाने सुमारे ४५ मिनिटे पाहणी केली; पण ती कशासाठी? हे मात्र गुलदस्तात आहे. या संदर्भात प्रांताधिकारी हिंमतराव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आज सुटी आहे. आम्हाला याबाबत कुणी काहीही कल्पना दिलेली नाही. नक्की सांगता येणार नाही,’ असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
हेलिकॉप्टर आले... उतरले... निघून गेले...
By admin | Published: September 14, 2016 3:41 AM