सुषमा नेहरकर शिंदे, पुणेलग्नामध्ये विविध फंडे वापरण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असून, पुणे जिल्ह्यात चक्क ‘वधू-वरा’ला लग्न मंडपापर्यंत आणणे किंवा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी हेलिकोप्टर वापरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात ११ लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केल्याची माहिती समोर आली आहे.लग्नासारख्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च करणे टाळण्याचे आव्हान वेळोवेळी विविध घटकांकडून केले जाते. परंतु यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली असून, सध्या सर्वसामान्य सर्वच लग्नांमध्ये वधूला टीव्ही, फ्रीज सारख्या संसार उपयोगी वस्तू देणे सामान्य झाले आहे. काही वधू पित्यांकडून वर पक्षाला खुष करण्यासाठी टू-व्हीलर, फोर-व्हीलर देखील भेट दिली जाते. हे कमी की काय पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये लग्नामध्ये हेलिकोप्टरचा वापर करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. वधूला डोली ऐवजी चक्के हेलिकोप्टर मधून आणणे किंवा लग्न मंडपात प्रवेश करताना वधू-वर यांच्यावर हेलिकोप्टर मधून पुष्पवृष्टी करण्याचे प्रमाण वाढत आहे. पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने हवेली, शिरुर, खेड, मावळ आणि दौंड तालुक्यांमध्ये हेलिकोप्टरची क्रेझ वाढत आहे. अनेक लग्नामध्ये सध्या हा प्रतिष्ठेचा विषय होऊ लागला आहे.कोणत्याही खाजगी कार्यक्रमासाठी हेलिकोप्टरचा वापर करण्यासाठी जिल्हाधिका-यांची कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या लग्नासाठी हेलिकोप्टर वापरण्यासाठी महिन्याला सरासरी तीन ते चार अर्ज येतात. हे अर्ज आल्यानंतर याबाबत पोलिस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अभिप्राय घ्यावे लागतात. त्यानंतर सुरक्षितेच्या सर्व गोष्टी तपासून हेलिकोप्टरसाठी परवानगी देण्यात येते. सध्या या परवानगीसाठी येणा-या अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी सांगितले. याला प्रतिबंध घालण्यासाठी लग्नासाठी हेलिकोप्टर वापरण्यासाठी अर्ज आल्यानंतर हे अर्ज आयकर विभागाला देखील पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लग्नासाठी पुष्पवृष्टी करणे किंवा वधू-वराला लग्न मंडपापर्यंत सोडण्यासाठी काही खासगी कंपन्यांकडून भाडेतत्वावर हेलिकॉप्टर देण्यात येतात.
‘हेलिकॉप्टर वधू-वरां’मुळे प्रशासनासमोर डोकेदुखी
By admin | Published: May 12, 2015 4:23 AM