पुणे : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने बुधवारी सकाळी लाखो वैष्णवांसह अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्र्भिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान घेण्यात आले. सायंकाळी माऊलींची पालखी पुण्यात प्रवेश करणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे शहरात दाखल होताच तिच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पुणे बार असोसिएशनच्या वतीने शिवाजीनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ही पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तत्पूर्वी प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख व पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे हे माऊलींच्या पालखीचे सारथ्य करतील. पालखी चौकात दाखल होताच तिच्यावर हेलिकॉप्टरमधून गुलछडीचा वर्षाव करण्यात येईल. यासाठी तीस किलो फुलांचा वापर करण्यात येणार आहे. या वेळी जवळपास दोनशे ते तीनशे वकील व न्यायाधीश उपस्थित राहतील, अशी माहिती असोसिएशनचे सचिव ॲड. अमोल शितोळे यांनी दिली.
लाखो वारकरी पुण्यात दाखल
आज पुण्यात दोन्ही पालख्यांचा प्रवेश होणार आहे. सकाळपासूनच शहरात भक्तिमय वातावरण झाले आहे. सर्व मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या काही दिंड्या काल रात्रीच शहरात दाखल झाल्या होत्या. तर काही आज सकाळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत लाखो वारकरी पुण्यात आल्याचे दिसून येत आहे.