- नारायण बडगुजर
पिंपरी : हॅलो, मुंबईतून बोलतोय, पाइपलाइनसाठी खोदकाम करताना सोने सापडले आहे. निम्म्या किमतीत देतो, लवकर घ्यायला या, असे म्हणून सायबर चोरट्यांकडून गंडा घालण्याचा नवा फंडा अवलंबला जात आहे. यातून अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावर सध्या सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नवनवीन पद्धतींचा अवलंब करत फसवणुकीचा ‘उद्योग’ चालवला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. अशाच पद्धतीने पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिकांना अनोळखी मोबाइल क्रमांकांवरून फोन येत आहेत. यात फोन करणारी अनोळखी व्यक्ती संबंधित मोबाइलधारकास ओळखत असल्याचे सांगते. यातून विश्वास संपादन केला जातो.
ट्रु काॅलरवरील नावाने होते ओळख
स्मार्ट फोनमध्ये ‘ट्रु काॅलर’ ॲप्लिकेशन असते. अनोळखी फोन क्रमांक असलेल्या व्यक्तीचे नाव या ‘ॲप’मुळे समजते. याचाच गैरफारयदा घेत सायबर चोरटे काॅल करून संबंधित मोबाइलधारकाचे नाव घेऊन संवाद साधतात. त्यामुळे संबंधित मोबाइलधारकाला संशय येत नाही.
पैशांची मागणी
सोने निम्म्या किमतीत किंवा त्याहीपेक्षा कमी पैशांमध्ये देतो, असे सांगून पैशांची मागणी केली जाते. ‘ॲडव्हान्स’ म्हणून काहीतरी रक्कम ऑनलाइन पाठवा, अन्यथा दुसऱ्या ग्राहकाला सोने देऊ, असे सांगितले जाते.
तुम्ही पोलीस नाहीत...
पिंपरी येथे एका मोबाइलधारकाला फोन आला. मी पोलीस आहे लगेच तिकडे येतो, असे मोबाइलधारकाने सांगितले. तरीही अनोळखी व्यक्ती घाबरली नाही. तुम्ही पोलीस नाहीत. आम्ही पोलिसांचा आवाज आणि बोलणे ओळखतो. मात्र, तुम्ही याबाबत पोलिसांना माहिती देऊ नका, आम्हाला सोने विक्री करायचे आहे, तुम्ही घेणार नसाल तर सोने घेण्याबाबत तुमच्या ओळखीतील कोणालाही सांगा, असेही अनोळखी व्यक्ती सांगते.
हिंदीतून संभाषण
हॅलो, ....तूम बात कर रहे हो ना? मै मुंबईसे बात कर रहा हू, आप दो महिने पहिले मुंबईमे आये थे तब मेरी टॅक्सीसे मुंबईमे ट्रॅव्हल किया था, तब आपका फोन नंबर लिया था, इसलिए अब आपको काॅल किया है, हमारे पास जेसीबी है, उससे पाइपलाइन खोदते हुए सोना मिला है, वो बेचना है, तुम्हे आधे दाममे देंगे, अभी हम मुंबई के वरली मे है, जल्दी से बोलो सिर्फ आधे दाममे लेलो, असे म्हणून अनोळखी व्यक्ती विश्वास संपादन करते.
राजस्थानी सायबर चोरट्यांचे रॅकेट?
सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन पद्धतींनी आर्थिक फसवणूक करण्यात राजस्थानी सायबर गुन्हेगारांचे अनेक रॅकेट सक्रिय असल्याचे काही प्रकरणांवरून समोर आले आहे. या रॅकेटकडून अशा पद्धतीने फोन करून फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
खाेदकामात सोने सापडल्याचे सांगून ते कमी किमतीत देण्याच्या आमिषाने फसवणूक केली जाते. त्यामुळे कमी किमतीत देतो, खूप छान ऑफर आहे, असे कोणी सांगत असल्यास जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. भूलथापांना बळी पडू नये. अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास प्रतिसाद देण्याचे टाळावे. संशय आल्यास पोलिसांना माहिती द्यावी.
- डाॅ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड