वेबसाइटद्वारे पवार यांचा नंबर व आवाज भासवून फोनवर मागितली खंडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोणत्या तरी वेबसाइटचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून “हॅलो, मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक,” असे म्हणून खंडणी मागितली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण येथे जानेवारी ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान हा गुन्हा घडला.
धीरज धनाजी पठारे (रा. यशवंतनगर, खराडी, पुणे) व त्याचे अनोळखी साथीदार, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रतापराव वामन खांडेभराड (वय ५४, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशांसाठी आरोपीने फिर्यादीला वारंवार फोन करून धमकी दिली. आरोपी हा ३० मे २०२१ रोजी फिर्यादीच्या घरी आला. व्याजाचे पाच कोटी द्याच, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी आरोपीने धमकी दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपीने ९ ऑगस्ट रोजी कोणत्यातरी वेबसाइटचा वापर करून अज्ञात व्यक्तीमार्फत फिर्यादीला फोन केला व शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. याप्रकरणी आरोपी पठारे व त्याला इंटरनेटद्वारे खोटे कॉल करून त्याला साथ देणारे त्याचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
आरोपींनी कॉम्प्युटरचा वापर करून फिर्यादीला कॉल केला. यात आरोपीच्या फोन नंबरऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरातील फोन नंबर दिसत होता. इंटरनेटद्वारे असा खोटा कॉल करून आरोपींनी आवाजाची नक्कल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड