पिंपरी : सुनेच्या खुनाची दिलेली सुपारी स्वत:वर उलटली. यात सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच खून झाला. मुलानेच ही सुपारी दिल्याचा संशय आला. मात्र, एका मोबाइल क्रमांकावर केलेल्या रिचार्जवरून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.
चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ डिसेंबर २०२०मध्ये एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा दिसून येत नव्हत्या. त्यामुळे मृत्यूचे कारण समजून येत नव्हते. मात्र, चेहरा लालसर असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. गळा आवळून खून करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी तपास सुरू केला. मृत व्यक्ती खेड तालुक्यातील शेतकरी असल्याचे समारे आले. मृत शेतकऱ्याचा कोणाशीही वाद नव्हता. तसेच जमीन किंवा पैशांचे व्यवहारदेखील नव्हते. त्यांचा मुलगा जेसीबी व इतर व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. मात्र, मुलाने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यामध्ये आणि त्याच्या मुलामध्ये वादाचे प्रकार होत असल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली. मात्र, त्याने त्याच्या शेतकरी वडिलांचा खून केला नसल्याचे सांगितले.
दरम्यान, मयत शेतकऱ्याचा मोबाइल फोन मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला. मोबाइल फोनमधील सिमकार्डसाठी रिचार्ज कोठून केले याचा शोध घेतला. त्यावेळी रिचार्जवाल्याकडून समजले की, मयत शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी एक सिमकार्ड घेतले होते. त्याचा रिचार्ज काही दिवसांपूर्वीच केल्याचे समोर आले. त्यावरून तांत्रिक तपास केला असता नव्या सिमकार्ड क्रमांकावरून केवळ एकाच क्रमांकावर अनेक वेळा संपर्क साधल्याचे दिसून आले. संपर्क साधलेला क्रमांक हा मयत शेतकऱ्याच्या मुलाकडील जेसीबीवरील चालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जेसीबीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविला असता तो पटापट बोलू लागला.
शेतकऱ्याच्या मुलाचे त्याच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिले. त्यानंतर मुलाने त्याचे प्रेम असलेल्या तरुणीच्या संपर्कात येऊन तिच्याशी लग्न केले. ही बाब शेतकऱ्याला खटकली. मुलाच्या दुसऱ्या बायकोचा ‘काटा’ काढायचा, असे शेतकऱ्याने ठरवले. त्यासाठी जेसीबीचालकाला गाठले. त्याला सुपारीची रक्कम दिली. मात्र, जेसीबीचालक टाळाटाळ करत होता. सुपारीचे काम पूर्ण कर किंवा रक्कम परत कर, असा तगादा शेतकऱ्याने लावला. त्यामुळे जेसीबीचालकाने शेतकऱ्याला निर्जनस्थळी बोलावले. तेथे जेसीबीचालकाने त्याच्या मित्रांसह शेतकऱ्याचा गळा आवळून खून केला. तसेच खुनानंतर शेतकऱ्याचा मोबाइल घेऊन पळून गेला.
रिचार्जवाल्याकडून मिळाला क्ल्यू
शेतकरी त्याच्या मोबाइल क्रमांकासाठी एका दुकानदाराकडून रिचार्ज करायचा. पोलिसांनी दुकानदाराकडे चौकशी केली. शेतकऱ्याने त्याच्या नियमित मोबाइल क्रमांकासह अन्य एका मोबाइल क्रमांकावरदेखील रिचार्ज केल्याचे दुकानदाराने सांगितले. त्या क्रमांकावरून जेसीबीचालकासोबत सातत्याने संपर्क झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी जेसीबीचालकाला ताब्यात घेतले आणि खुनाची उकल झाली.
मोबाइल क्रमांकाला रिचार्ज करणे शेतकऱ्याला स्वत:ला जमत नव्हते. त्यात शेतकऱ्याचा मोबाइल मिळून न आल्याने तपासाची दिशा बदलली. मोबाइलमध्ये किती सिमकार्ड होते, कोठून रिचार्ज करायचा, अशा विविध बाजूंनी तपास केला. त्यामुळे गुन्ह्याची उकल झाली.
-अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी-चिंचवड