- नारायण बडगुजर
पिंपरी : बेवारस मृतदेहाची ओळख पटवली. खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. त्यानंतर विवाहित महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली. तिने बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली अन् एकतर्फी प्रेमातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या खून प्रकरणाला वाचा फुटली.
शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदनवाडी येथील पडक्या खोलीत १९ जानेवारी २०२२ रोजी तरुणाचा मृतदेह आढळला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच करीत होते. दरम्यान, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एक तरुण बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातील बेपत्ता तरुणाचे वर्णन चांदखेड येथे मृतदेह आढळलेल्या तरुणाशी जुळत होते. त्यावरून पोलिसांनी तरुणाची ओळख पटवली. तरुणाचे एका विवाहित महिलेशी एकतर्फी प्रेम होते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांना विवाहितेला व पतीला ताब्यात घेतले. मात्र, ती पोलिसांची दिशाभूल करीत होती. दरम्यान, पोलिस अंमलदार नागेश माळी आणि पोलिस अंमलदार दत्तात्रय खेडकर यांनी विवाहिता आणि मृत तरुणाच्या फोन नंबरची तांत्रिक माहिती काढली. त्यावरून ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखविताच ती पोपटासारखी बोलू लागली.
तोंडाला चिकटपट्टी लावून मारहाण
विवाहितेने तिच्या दाजी आणि मानलेल्या भावाच्या व त्यांच्या साथीदारांसोबत मिळून कट रचला. देवाची उरुळी येथील तरुणाला भेटण्यासाठी म्हाळुंगे एमआयडीसीत बोलावले. त्यानंतर तरुणाचे एका चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्याला मावळ तालुक्यातील करंजविहारे गावचे हद्दीत जंगलाच्या बाजूला नेऊन लाथाबुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केले. पुन्हा चारचाकी वाहनात बसवून तरुणाच्या तोंडाला चिकटपट्टी लावून गाडीमध्ये मारहाण केली. काही वेळाने तो बेशुद्ध झाल्याने व त्याची हालचाल बंद झाल्याने त्यास चारचाकी वाहनामधून चांदखेड खिंडीमध्ये जंगलाच्या बाजूला असलेल्या पडक्या इमारतीजवळ नेऊन पुन्हा लोखंडी रॉडने डोक्यावर मारून खोलीमध्ये टाकून दिले.
बोलण्यात विसंगती
महिलेकडे चौकशी केली असता तिचा दाजी आणि साथीदारांची नावे समोर आली. त्यानुसार सात जणांना ताब्यात घेऊन पोलिसांना प्रत्येकाकडे स्वतंत्रपणे चौकशी केली. त्यांच्या प्रत्येकाच्या बोलण्यात विसंगती होती. त्यामुळे त्यांना पुन्हा दंडुका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
एकतर्फी प्रेम, अपहरण अन् खून
तरुणाला बोलावून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याचा खून केला, तसेच त्याच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याच्या अंगावरील कपडे काढून घेतले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जंगलातील एका पडक्या खोलीत मृतदेह टाकून दिला. एकतर्फी प्रेमाची किनार असलेल्या या खून प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी कुशलतेने खून प्रकरणाची उकल केली.
बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. त्यासाठी गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. त्यानंतर खून प्रकरणाची उकल करण्यासाठी विविध कंगोरे तपासले. अखेर एकतर्फी प्रेमातून खून झाल्याचे निष्पन्न झाले.
- डाॅ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त