नितीश गोवंडे
पुणे : रेल्वेने प्रवास करणारी एक विवाहिता गाडी पुणे स्टेशनवर थांबताच तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीसाठी दूध आणायला खाली उतरते, पण दूध आणेपर्यंत रेल्वे निघून जाते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी संबंधित विवाहिता लोहमार्ग पोलिसांकडे येत तक्रार दाखल करते. मात्र, दरवेळी पोलिसांना वेगवेगळी माहिती सांगून चक्रावून सोडते. तक्रारदार महिलेच्या सांगण्यानुसार, पोलिसांची पथके दौंड, गुलबर्गा, मुंबई येथे धाव घेत नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा शोध घेतात. अखेर ऑनलाइन पेमेंटमुळे ती चिमुकली हैदराबादला पोलिसांना सापडते आणि चक्रावून टाकणारा तपास थांबतो.
स्थळ : पुणे रेल्वे स्थानक
तारीख : ३ फेब्रुवारी
काय घडले? : नेहमीप्रमाणे पुणे स्टेशनवर रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते... हैदराबाद - सीएसएमटी एक्स्प्रेस तिच्या नियोजित वेळेत रेल्वे स्थानकावर येते... एक विवाहिता नऊ महिन्यांच्या मुलीसाठी दूध आणण्यासाठी म्हणून मुलीला शेजारील महिलांकडे देत खाली उतरते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी महिला लोहमार्ग पोलिसांकडे येते आणि मी काल दूध आणण्यासाठी रेल्वेतून उतरली असता, रेल्वे निघून गेल्याने माझी मुलगी हरवली आहे, अशी तक्रार देते. पोलिसांच्याही मनात संशयाची पाल चुकचुकते. कारण, घटना घडल्यानंतर संबंधित महिला दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल करत आहे. तरीही घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखत लोहमार्ग पोलिसांची पथके वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला लागतात.
मुलीला मुद्दाम रेल्वेत सोडले..
पोलिस सर्वप्रथम स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासतात. त्यावेळी संबंधित महिला रेल्वेतून सर्व सामान घेऊन उतरताना दिसते. मात्र, ती कुठेही दुधाचा शोध न घेता रेल्वे जाण्याची वाट बघत असल्याचे दिसते. तिच्यासोबत तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकाला पोलिस विचारतात तेव्हा तो युवकदेखील तिचा कोण नातेवाईक नसून मित्र असल्याचे पोलिसांना सांगतो. आणि मीच तिला तुमच्याकडे घेऊन आलाे आहे, असेही सांगतो. यामुळे संबंधित महिलेनेच मुलीला मुद्दाम रेल्वेत सोडल्याचा संशय पोलिसांना येतो.
मुलीला दौंडजवळ मारून टाकले...
महिला खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच, तिला पोलिसी खाक्या दाखवला जातो. तेव्हा ती आपणच मुलीला दौंड - कुर्डुवाडी रेल्वे स्थानकादरम्यान बाथरूममध्ये गळा आवळून मारून टाकल्याचे आणि तिला रेल्वेतून खाली फेकून दिल्याचे सांगते. यामुळे पोलिसांचे एक पथक दौंडकडे रवाना होते. तेथे जाऊन पाहणी केली असता, कुठेही मुलीचे शव आढळून येत नाही. अथवा अशा घटनेची नोंद नसल्याचे समोर येते. त्यामुळे मुलीचे नेमके झाले तरी काय? असा प्रश्न पोलिसांना पडतो. त्यानंतर पुन्हा सुरू होते संबंधित महिलेची चौकशी.
ती माझी मुलगी नाही...
तक्रारदार महिला संबंधित मुलगी माझी नसून, गुलबर्गा येथील सरकारी रुग्णालयात मला मृत मुलगा जन्माला आला होता. त्यामुळे तीन मुले झालेल्या एका महिलेकडून या नऊ महिन्यांच्या मुलीला घेतले हाेते, असे ती पोलिसांना सांगते. पोलिसांचे एक पथक तत्काळ गुलबर्गा येथे मार्गस्थ होते. संबंधित सरकारी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली असता, संबंधित नऊ महिन्यांची मुलगी ही तिचीच असल्याची माहिती पोलिसांना समजते. त्यानंतर पोलिस संबंधित महिलेच्या पालकांकडे खात्री करतात, तेव्हा ते देखील आमची मुलगी खोटं बोलत असल्याचे सांगतात, मात्र अन्य कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करतात.
तोपर्यंत एक पथक मुंबईत...
सीसीटीव्ही फुटेजवरून माग काढत लोहमार्ग पोलिसांचे एक पथक मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे दाखल होते. तेथील सीसीटीव्ही तपासले असता, काही बुरखाधारी महिला त्यांना दिसतात. त्यातील एकीच्या खांद्यावर त्यांना ही मुलगी दिसते. त्या बुरखाधारी महिला रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडून एका टॅक्सीने जाताना दिसतात. टॅक्सीच्या नंबरवरून ते संबंधित टॅक्सी चालकापर्यंत पोहोचतात. तेव्हा या महिलांना हाजीअली येथे सोडल्याचे तो टॅक्सी चालक सांगतो.
ऑनलाइन पेमेंटमुळे मुलगी मिळाली...
पोलिसांचे पथक हाजीअली येथे जाऊन तेथील सीसीटीव्ही तपासतात, तेव्हा संबंधित बुरखाधारी महिला तेथील एका दुकानात गुगल पे द्वारे ऑनलाइन पेमेंट करताना दिसून येतात. त्या दुकानदाराकडून ऑनलाइन पेमेंट संदर्भातील सर्व माहिती पडताळली असता, संबंधित महिला या हैदराबादच्या असल्याचे समोर येते. त्यानंतर पोलिसांचे अजून एक पथक तत्काळ हैदराबादकडे रवाना होते. तेथे संबंधित महिलेच्या घरी पोलिस जाताच त्यांना नऊ महिन्यांची मुलगी आढळून येते.
मी अविवाहित, या मुलीचे काय करू...
मुलगी घेऊन हैदराबादला गेलेल्या महिलेकडे पोलिस चौकशी दरम्यान ती महिला सांगते की, रेल्वेत एका महिलेने मी अविवाहित असल्याचे सांगून ही मुलगी कोणीतरी माझ्या हातात ठेवून पळून गेल्याचे सांगत, या मुलीचे मी आता काय करू, असे म्हणत मुलगी आमच्याकडे सोपवून गेल्याचे सांगते. आता या मुलीला रस्त्यात सोडण्यापेक्षा हैदराबाद येथे येऊन मुलीला पोलिसांच्याच स्वाधीन करणार होतो, अशी माहिती देते. पोलिस या माहितीची खातरजमा करतात आणि संबंधित मुलीला घेऊन पुण्यात येतात.
खरा प्रकार येतो समोर...
तक्रारदार महिलेचे तिच्यासोबत असलेल्या आणि मित्र म्हणून सांगणाऱ्या मुलासोबत लग्न ठरलेले असते. मात्र, त्याच्या घरचे पैशांची जमवाजमव करण्यासाठी वेळ लागणार असल्याने ठरलेली लग्नाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती तिच्या पालकांना करतात. मात्र, मुलीचे वडील ठरलेल्या दिवशीच मुलीचे लग्न लावण्यावर ठाम असल्याने ते नात्यातीलच एका मूकबधिर मुलाशी तिचे लग्न लावून देतात. त्यानंतर तिला ही मुलगी होते. मुलगी नऊ महिन्यांची झाल्यानंतर संबंधित महिला पुण्याच्याच मुलाशी लग्न करण्याचे ठरवते आणि पळून पुण्याला येते. पोटची मुलगी अडथळा ठरू नये म्हणून तिने रेल्वेत मुलीला सोडून दिले. त्यानंतर मात्र मुलीच्या विरहामुळे ती मित्रासोबत तक्रार देण्यासाठी लोहमार्ग पोलिस ठाण्यात येते. त्या मित्रालादेखील पोलिस ठाण्यात आल्यावरच हिचे लग्न झाले असून, तिला नऊ महिन्यांची मुलगी असल्याचे समजते.
अजून एक धक्का..
या प्रकरणात पोलिसांना संबंधित महिलेची देहबोली ही सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटत असल्याने तक्रारदार महिलेची पोलिस वैद्यकीय तपासणी करतात. तेव्हा त्यांना अजून एक धक्का बसतो. तो असा की, संबंधित महिला ही सज्ञान नसून साडेसतरा वर्षांची एक अल्पवयीन मुलगी आहे. त्यानंतर पोलिसांचा मोर्चा तिच्या पालकांकडे वळतो. पालकांविरोधात तसेच तिच्या नवऱ्याविरोधात बालविवाह आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करतात. तक्रारदार मुलगी पालकांकडे जाण्यासाठी नकार देत असल्याने तिची रवानगी कोंढव्यातील महिला व बालकल्याण मंडळाच्या सुधारगृहात केली जाते, तर नऊ महिन्यांच्या मुलीला भारतीय समाजसेवा केंद्रात पाठविण्यात येते.
संबंधित तक्रारदार मुलगी आमच्याकडे आली तेव्हापासून आम्हाला तिच्यावर संशय येत होता, पण प्रथम कर्तव्य त्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीला शोधण्याचे होते. आम्हाला सगळ्यात जास्त काळजी त्या चिमुकलीची होती. आमच्या क्राईम पीआय स्मिता वानसिक यांच्यासह संपूर्ण पथकाने झोकून देत काम केले. विविध संशय मनात येत होते, मुलगी नेहमी कोणाच्या हातात जाईल याची भीती वाटत होती. चांगले काम केल्याचे खूप समाधान वाटले, वरिष्ठांनीदेखील या कामाची दखल घेत कौतुक केले.
- राजेंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोहमार्ग.