पुणे : हेल्मेटसक्तीच्या विरोधात पुणेकर एकवटू लागले असून, आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व संघटनांनी फुले मंडईजवळ आंदोलन केले. हेल्मेटसक्ती मागे न घेतली गेल्यास गुरुवारी सायंकाळी टिळक चौकात मानवी साखळी धरण्यात येणार आहे.राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते. आमदार मेधा कुलकर्णी, उपमहापौर आबा बागुल, हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे, नगरसेवक धनंजय जाधव, संदीप खर्डेकर, डॉ. शैलेश गुजर, नितीन गुजराती, उल्हास भट आदींनी हेल्मेटविरोधात घोषणा दिल्या. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या आंदोलनास पाठिंंबा देत सांगितले की, पुणेकरांची भावना व्यक्त करण्यासाठी आपण येथे आलो आहे़ जे पुणेकरांना नको असेल, त्यांच्याबरोबर आम्ही राहू़ आमदार कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला व हेल्मेटसक्ती विरोधी जनभावना व इतर तथ्ये सांगितली़ सर्व बाबींची माहिती घेतल्यावर मुख्यमंत्री यांनी हेल्मेटसक्ती रद्द करण्यासंबंधी आदेश पोलीस महासंचालक यांना देणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले.(प्रतिनिधी)
हेल्मेटला सर्वपक्षीय विरोध
By admin | Published: November 17, 2014 5:07 AM