पुणे: वाहतुक विभागाच्या धडक कारवाईनंतर पुणेकरांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. वाहतुकीचे नियम तोडल्याने शहरातील लाखो नागरिकांना ई-चलन दंड पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये बऱ्याच जणांनी दंड न भरल्याने अनेकांना न्यायलयाकडून नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत. या अचानक आलेल्या नोटिसांमुळे पुणेकरांचे धाबे दणाणले आहेत. आपल्याकडे असलेल्या गाडीवर कोणता दंड आहे का? असेल तर तो किती? हे तपासण्यासाठी पुणेकरांची तारांबळ उडाली आहे.
अशात पुण्यामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. झालं असं की, वाहतुक विभागाने केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे अनेकांनी आपल्या नावावर किती दंड आला आहे हे पाहण्यास सुरवात केली. यामध्ये शहरातील एका व्यक्तीच्या चारचाकीला हेल्मेट न घातल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील एका व्यक्तीकडे मारुती सुजूकीची 'एस एक्स 4' ही कार आहे. वाहन मालकाला 9 जानेवारी 2019 हा दंड करण्यात आला होता. नागरिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा येत असल्याने गाडी मालकाने त्यांच्या गाडीवरील दंड चेक केल्यानंतर त्यांना हेल्मेट न घातल्याने 500 रुपये आणि पोलिस नियम तोडल्याचे 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे गाडी मालकाने कारला वाहतुक विभागाने हेल्मेटचा दंड कसा लावला याबद्दल प्रश्न केला आहे.
असा प्रकार कशामुळे झाला?यापूर्वीही अनेक चारचाकी, कार, रिक्षांना हेल्मेटचा दंड आला आहे. वाहनांचे नंबर खराब झालेले किंवा आकड्यांचा रंग गेलेला असतो त्यामुळे कधीकधी दंड होणाऱ्या वाहनांचा नंबर सिस्टममध्ये टाकताना चूका होतात. तसेच कधीकधी चोरीच्या वाहनांवरही एखाद्या गाडीचा नंबर टाकल्यानंतर तो नंबर ज्या गाडीमालकाच्या नावे आहे त्या व्यक्तीला दंडाचे चलन जाते, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.
जर चलनाबद्दल काही तक्रारी असतील तर प्लेस्टोअरवरून MahaTraffic हे अॅप डाउनलोड करा. हे अॅप उघडल्यानंतर तुम्हाला Grievance असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार तिथे दाखल करू शकता.-राहूल श्रीरामे (पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे)
दहा लाख वाहनचालकांना नोटिसा- ‘लोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘सामा’ या खासगी कंपनीचे सहकार्य घेण्यात आले आहे. या कंपनीला वाहतूक विभागाशी जोडून देण्यात आले आहे. सध्या वाहतूक विभागाकडे १७ लाख वाहनचालकांचा डेटा आहे. मात्र, त्यातील पाच लाख लोकांचे मोबाइल क्रमांक नाहीत. त्यामुळे दहा लाख वाहनचालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.’
- प्रताप सावंत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण