पुणे : भारत देश तंत्रज्ञान व आरोग्य या क्षेत्रात अग्रेसर आहे. भारतात नागरिक आजारने कमी अपघाताने जास्त संख्येने मृत्युमुखी पडत आहेत. आपण वाहन चालवताना हेल्मेट घालणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालवणे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबणे, असे वाहतुकीचे व रस्त्याचे सर्व नियम पाळले तर अपघात होणार नाहीत. यासाठी संरक्षण म्हणून हेल्मेट घालणे हे कायद्यात दिले आहे. हेल्मेटसक्ती नाही एक शिस्त आहे, असे मत पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी व्यक्त केले. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भारत कला प्रसारिणी आणि वाहतूक पोलीस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियंमाबाबत जनजागृती करणाऱ्या चित्रप्रदर्शनात ते बोलत होते. वेंकटेशम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन केले. वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, महानगरपालिका अतिक्रमण विभाग उपायुक्त माधव जगताप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, भारतीय कला प्रसारिणी सभेचे पुष्कराज पाठक, अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य विलास चोरबोले उपस्थित होते. अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनातून पाच सर्वोत्तम चित्रांना पारितोषिक देऊन गौरविले. त्यामध्ये कामाक्षी कोल्हापूरे, प्रतीक्षा बऱ्हाटे , प्रतीक भुरावणे, श्रेया जोशी, ओंकार कुंजीर यांना पारितोषिके दिली. वेंकटेशम म्हणाले, १९ व्या शतकात युद्ध, रोग, दुष्काळ या तीन गोष्टींमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले होते. तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण वाढल्याने मानवाने या तिन्हीवर मात केला.विसाव्या शतकात मृत्यूचे प्रमाण कमी न होता तेवढेच राहिले. कारण या शतकात वाहने वाढत गेली. तसेच वाहतुकीचे नियम दिले असूनही ते पाळण्यास नागरिक तयार होत नसे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. सर्व भारतीयांनी रस्ते वाहतुकीच्या कायद्यांचे पालन करायला हवे. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यावर आपण एक माणूस म्हणूम त्याला मदत केली पाहिजे. त्याठिकाणी व्हिडिओ काढून तो प्रसारित करण्यात वेळ घालवू नये. सद्यस्थितीला पुणे महानगरपालिका, वाहतूक प्रादेशिक परिवहन मंडळ पुणे वाहतूक पोलीस यांच्या सहकायार्ने गेल्या महिन्यापासून अपघात नियंत्रणात मदत झाली आहे. डिसेंबरमध्ये ३५ टक्के अपघात प्रमाण कमी झाले तर जानेवारीत ४४ टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. आम्ही सर्व अपघात कमी होण्याच्या दृष्टीने प्रयन्तशील आहोत.विद्यार्थ्यांनी काढलेल्या जनजागृती चित्रांचे प्रदर्शन ११,१२,१३ या कालावधीत राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. ..............................आपल्या भारतात युद्धांमध्ये जेवढे मृत्युमुखी पडले नाहीत. त्यापेक्षा जास्त वाहतुकीच्या अपघातांमध्ये पडले आहेत. आपण सर्वांनी शून्य अपघात ही संकल्पना समाजात रुजवली पाहिजे. आपण सारे भारतीय आहोत. प्रतिज्ञेत सारे भारतीय माझे बांधव आहेत असे म्हणतो. रस्त्यावर धारातीर्थी पडलेल्या व्यक्तीला वाचवणे आपले कर्तव्य आहे. २०२१ सालापासून एकही अपघात होणार नाही असे ध्येय आम्ही ठेवले आहे. - तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
हेल्मेट सक्ती नाही एक शिस्त : के. वेंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 8:01 PM
वाहतुकीचे व रस्त्याचे सर्व नियम पाळले तर अपघात होणार नाहीत. यासाठी संरक्षण म्हणून हेल्मेट घालणे हे कायद्यात दिले आहे.
ठळक मुद्देवाहतूक नियंमाबाबत जनजागृती करणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन