वानवडी : पुणे-सोलापूर रस्त्यावरील एआयपीटी समोर असलेल्या दुकानांमधील दीपक हेल्मेट शाॅपी दुकानाला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत दुकानातील सर्व हेल्मेट जळून खाक झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्यानंतर हडपसर येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यास सुरुवात झाली. त्यादरम्यान कोंढवा व कॅन्टोन्मेंट भागातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवता आले व कोणतीही जीवितहानी न झाल्याचे अग्निशमन दलाचे हडपसर स्टेशन ड्यूटी अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले.
दुकानासमोर दोन ते तीन चारचाकी वाहने होती. ही वाहने मागच्या बाजूने थोड्या प्रमाणात जळाली आहेत. आग लागली त्या दुकानाच्या दोन दुकाने सोडून फटाक्याचे दुकान आहे. वेळीच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण समजले नसून शाॅर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोलापूर रस्त्यावर आग पाहणाऱ्यांची गर्दी वाढल्याने वाहतूककोंडी झाली होती. वानवडी वाहतूक पोलीस विभागाने घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.